धनंजय पवार यांचे दु:खद निधन

धनंजय पवार यांचे दु:खद निधन

लातूर: (प्रा. नागसेन कांबळे) महावितरण लातूरचे जनसंपर्क अधिकारी मा. धनंजयकुमार लक्ष्मण पवार यांचे शनिवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले. धनंजय पवार हे डॉ. बा.आ. मराठवाडा विद्यापीठातून बी. जे. आणि एम. जे. चे शिक्षण पूर्ण केले होते. मुळात पत्रकारितेची आवड असलेल्या धनंजय पवार यांनी नाट्यशास्त्रात आपली रुची वाढवून साहित्य, कला व संस्कृती यात आपल्या परीने रचनात्मक कार्य करत होते. त्यांनी अनेक वर्ष पांथस्थ नावाचे पक्षिकही चालवले. विद्यापीठातील युवक महोत्सवाचे त्यांचे नाते आजही कायम होते. त्यांनी प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रात आपला मित्रपरिवार जोडला होता.सर्वांसाठी सतत मदत करणारा , जिव्हाळ्याने विचारपुस करून धाऊन जाणारा एक निस्वार्थ मित्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या अशा अकाली जाण्याने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.

पत्रकार शिवाजी कांबळे यांच्या फेसबुक वॉल वरून साभार

IMG-20261107-WA0010

आज सकाळी सकाळी मोठा धक्का बसला... आपोआप हुंदका येऊन डोळे पाणावले...! माझा प्रिय मित्र धनंजय वत्सला लक्ष्मण पवार ह्रदय विकाराच्या झटक्याने गेल्याची बातमी आमचे हिंगोलीचे मित्र राम श्रुंगारे यांनी फोनवरून मला सांगितली. मला विश्वासच बसेना.. मी लातूरला राहत असल्याने कन्फर्म करण्यासाठी फोन केला होता. गेल्या महिन्यात तर माझी नी धनुची म्हणजे धनंजय पवारची भेट झाली होती... मग तातडीने धनुचे कपिलनगर येथील घर गाठले... तर काय पुरा हादरून गेलो. धनुच्या बहिणी रडत होत्या.. धनूला पांघरून झोपवले होते.. मी म्हणालो, तोंडावरचे काढा.. धनूला बघायचेय... धनुचा चेहरा बघितला.. मनाची घालमेल झाली.. धनुसोबतच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.. हुंदका आवरला.. धनुच्या वडिलांना भेटलो.. धीर दिला..

औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठात 1997 ला धनंजय पवार आणि माझी भेट झाली. माझा बी. जे. ला नंबर लागला होता. नी धनु एम. जे. करत होता.. डॉ. सुधीर गव्हाणे सरांनी माझी राहायची व्यवस्था पी. जी. हॉस्टेलला धनंजय पवार याच्या रूममद्ये केली... दोन वर्षे आम्ही रूममेंट होतो.. समूराई बाईक धनुकडे होती, एक संगणक होता..त्यावेळी त्याला भेटायला लातूर भाजयुमोचे संभाजी पाटील निलंगेकर, सुनील गायकवाड यायचे...धनु म्हणजे सोफिस्टिकेटेड होता. धनूने मला खुप मदत केली..तो दिग्दर्शक शाम बेनेगलवर पीएच. डी. ची तयारी करत होता. नंतर मी उस्मानाबादला येरमाळ्यात परतलो. धनुचे तसे मूळ गाव उस्मानाबाद जवळचे सारोळा. मात्र त्याचे कुटुंब लातूरला शिफ्ट झालेलं. वडील शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक..मधल्या काळात धनंजयने ' पांथस्थ' नावाचे पाक्षिक चालवले. मी त्याचा उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी होतो. 2012 ला आमची लातूर भेट झाली.. तो महावितरणचा जनसंपर्क अधिकारी झाल्याचे कळले..लातुरात आमच्या अधून मधून भेटी व्हायच्या..

अशातच भेट झाली नाही.. आणि आज ही दुःखद बातमी..

धनंजय पवार यांच्या पश्चाताप वडील, चार बहिणी, लहान भाऊ,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे.

आज दुपारी अडीच वाजता लातूर येथील खाडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत..

मित्रास भावपूर्ण श्रद्धांजली!🙏

प्रा. डॉ. राजेंद्र गोनारकर यांच्या फेसबुक वॉल वरून 

FB_IMG_1794039582825

प्रिय धनंजय पवार यांना भावपूर्ण आदरांजली

तुमच्या जाण्यानं मन सुन्न झालंय.

 

दीपरत्न निलंगेकर यांनी धनंजय पवार गेल्याची बातमी कळवली आणि मन अगदी सुन्न झालं. क्षणभर विश्वासच बसेना. अत्यंत मृदू आवाजात बोलणारा, चेहऱ्यावर कायम प्रसन्न हास्य असणारा त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर तरळून गेला.

धनंजय पवार म्हणजे आमच्या सगळ्यांचे लाडके ‘धनू’!

अत्यंत मनस्वी, मनमिळावू आणि विलक्षण संवेदनशील व्यक्तिमत्त्व. आपली भूमिका अत्यंत संयतपणे मांडणारे, पण त्या भूमिकेबाबत तितकेच आग्रही असणारे. कला, साहित्य, संगीत आणि चित्रपट हे त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय. या सगळ्यांविषयी त्यांना असलेली आस्था आणि त्यांची अभिरुची खरोखरच विलक्षण होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हॉस्टेल क्रमांक दोनमधील त्यांची खोली म्हणजे साहित्य, कला आणि संस्कृतीचं एक छोटेखानी दालनच होतं. तिथं गेलं की नवनव्या पुस्तकांची, संगीताची, चित्रपटांची आणि साहित्यिक चळवळींची चर्चा रंगायची. त्यांनी आणलेल्या भल्यामोठ्या सीडी प्लेअरवर कितीतरी गझला त्यांनी मला ऐकवल्या होत्या. 'मुक्ता' चित्रपटाची गाणीही पहिल्यांदा त्यांच्यामुळेच ऐकायला मिळाली. त्या काळात आम्हा अनेकांकडे साधी सायकलही नसायची. अशा काळात ते मोटारसायकलवर फिरत असत. पण त्याचा कधी गर्व नाही, कुणाबद्दल कणभरही दुजाभाव नाही, कुणाचा दुस्वास नाही. माणसांवर प्रेम करणं हा जणू त्यांचा सहजस्वभावच होता.

वयाच्या विशी-पंचविशीतच त्यांनी ‘पांथस्थ’ हे नियतकालिक सुरू केलं होतं. आम्हा सगळ्या मित्रांना त्यांनी त्यात लिहायला सांगितलं. नव्या विचारांना, नव्या लेखनाला व्यासपीठ मिळावं, ही त्यामागची त्यांची तळमळ होती. सिद्धोधन कांबळे यांनी डॉ. गंगाधर पानतावणे सरांवर टीका करणारा लिहिलेला लेख त्या काळात खूप गाजला होता. त्या सगळ्या चर्चा, मतभेद, वादविवाद आणि त्यातून बहरत गेलेली मैत्री आजही तितकीच ताजी आहे.

पुढे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी म्हणून ते नांदेडला आले आणि आम्ही पुन्हा एकाच शहरात आलो. मात्र या काळात भेटी तशा तुरळकच झाल्या. तरीही त्यांचा स्नेह, प्रेम आणि आपुलकी यात कधीच अंतर पडलं नाही. भेट झाली की जुन्या आठवणींना उजाळा मिळायचा. साहित्य, नाटक, संगीत आणि नव्या कल्पनांच्या गप्पा रंगायच्या. पुढे त्यांची लातूरला बदली झाल्याचं कळलं. त्यानंतर तर भेटही झाली नाही.

आणि आज अचानक त्यांच्या जाण्याची बातमी येऊन धडकली!

कितीतरी गोष्टी करायच्या राहून गेल्या. कितीतरी कल्पना प्रत्यक्षात यायच्या राहिल्या. त्यातल्या दोन गोष्टी तर आता मनाला अधिकच अस्वस्थ करत आहेत.

त्यांच्या आग्रहामुळे मी एक कविता लिहिली होती, ‘शहनाज’! ती कविता त्यांना बेहद आवडली होती. त्या कवितेत त्यांना नाटकाची शक्यता दिसत होती. तेव्हापासून त्यांचा एकच आग्रह होता, ‘‘या कवितेवर नाटक लिहा.’’ प्रत्येक भेटीत ते हमखास विचारायचे, ‘‘काय, झालं का लिहून?’’

दुसरी गोष्ट म्हणजे चार्वाक!

माझ्या पीएच.डी.च्या संशोधनाचा विषय चार्वाक होता. या विषयावर मी नाटक लिहावं, असा त्यांचा सतत आग्रह असायचा. चार्वाकाच्या विचारविश्वात त्यांना नाटकाची एक वेगळी शक्यता दिसत होती. त्याबद्दल ते मोठ्या आत्मीयतेने बोलायचे. दर भेटीत या दोन्ही नाटकांची ते आठवण करून द्यायचे. पण ही दोन्ही कामं अजूनही अपूर्णच राहिली आहेत. आणि आता...

‘शहनाजचं काय झालं? चार्वाकावरचं नाटक कुठपर्यंत आलं?’ असं हक्कानं, प्रेमानं आणि आत्मीयतेनं विचारणारा माझा दोस्तच आता राहिलेला नाही!

ही जाणीव खूपच अस्वस्थ करून जाते.

सगळे मित्र त्यांना प्रेमाने ‘धनू’ म्हणायचे. मात्र मी त्यांना नेहमीच आदरार्थी संबोधत आलो. आमच्यातलं हे वेगळेपणही आमच्या मैत्रीचाच एक भाग होतं. वयाने जवळपास समवयस्क असलो तरी आमच्या संवादातला आदर आणि स्नेह दोन्ही तितकेच जिव्हाळ्याचे होते.

आज त्या सगळ्या आठवणी मनात गर्दी करत आहेत. हॉस्टेलमधली ती खोली, तो भलामोठा सीडी प्लेअर, गझलांचे सूर, साहित्याच्या चर्चा, ‘पांथस्थ’चे दिवस आणि भेटीतून पुन्हा पुन्हा व्यक्त होणारा त्यांचा स्नेह...

आज मात्र मन सैरभैर झालंय.

त्यांनीच कधीतरी ऐकवलेल्या मुमताज रशीद यांनी लिहिलेल्या हरिहरन यांच्या आवाजातील गझलेच्या ओळी मनात सारख्या रेंगाळत आहेत...

फूल हैं, चाँद हैं क्या लगता है

भीड़ में सबसे जुदा लगता है...

उसकी कुर्बत में अजब दूरी है

आदमी होके खुदा लगता है...

धनंजय पवार हे खरोखरच गर्दीत वेगळे भासणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या सहवासात कला, साहित्य आणि मैत्रीला एक वेगळाच अर्थ प्राप्त व्हायचा.

धनू, तुम्ही असे अचानक जायला नको होतं...

प्रिय धनंजय पवार यांना भावपूर्ण आदरांजली!

तुमच्या आठवणी, तुमचा स्नेह आणि तुमच्या आवाजातली ती मृदुता मनात कायम जिवंत राहील...

IMG-20260624-WA0054

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

IMG-20251117-WA0399

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धनंजय पवार यांचे दु:खद निधन धनंजय पवार यांचे दु:खद निधन
लातूर: (प्रा. नागसेन कांबळे) महावितरण लातूरचे जनसंपर्क अधिकारी मा. धनंजयकुमार लक्ष्मण पवार यांचे शनिवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने...
कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
Join Us on Whatsapp