या दोन्ही पक्षांच्या नव्या युतीमुळे आता चंद्रपूरच्या सत्तेच्या समीकरणाने मोठी कलाटणी घेतली असून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही मोठ्या पक्षांची धाकधूक वाढली आहे. जो पक्ष आम्हाला महापौरपद देईल, त्यालाच आम्ही पाठिंबा देऊ, अशी थेट भूमिका ठाकरेसेनेने घेतल्याने आता चंद्रपुरात कोण कोणासोबत जाणार, याची चर्चा रंगली आहे.
चंद्रपूर महापालिकेच्या सत्तेत किंगमेकर ठरण्यासाठी ठाकरेसेना आणि वंचित बहुजन आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ठाकरसेनेचे 6 आणि वंचितचे 2 असे एकूण 8 नगरसेवक आता एकाच गटात आले आहेत.
ठाकरेसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी या नव्या युतीची घोषणा केली असून, आणखी 2 अपक्ष नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जर हे अपक्ष नगरसेवक सोबत आले, तर या गटाचे संख्याबळ 10 वर पोहोचणार आहे. यामुळे 66 सदस्य असलेल्या महापालिकेत हा गट सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
महानगरपालिकेत 30 जागांसह काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र बहुमतासाठी त्यांना अजून काही आकड्यांची गरज आहे. ठाकरेसेनेने काँग्रेसकडे प्रस्ताव पाठवला असून त्यांनी महापौरपदाची मागणी केली आहे.
संदीप गिरे यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही काँग्रेसला आमची भूमिका कळवली आहे, पण जर काँग्रेसने आमचा प्रस्ताव स्वीकारला नाही, तर आमच्यासमोर भाजपसह इतर पर्याय खुले आहेत. जो पक्ष आम्हाला आदर देईल आणि महापौरपद देईल, आम्ही त्यांच्याच बाजूने उभे राहू, असा इशारा दिल्याने आता काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

.jpeg)



Comment List