“महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकण्यासारखं”; बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपने केलं स्वीकृत नगरसेवक
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. याप्रकरणात शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे हा आरोपी असल्याचे उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यूही झाला. यानंतर आता या प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांना भाजपने स्वीकृत नगरसेवकपद दिले आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत शुक्रवारी पार पडलेल्या पहिल्या सभेत पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे दोन, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य समाविष्ट आहे. भाजपकडून तुषार आपटे यांची नियुक्ती होताच शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.
नगरपालिका निवडणुकीदरम्यान तुषार आपटे यांनी भाजपच्या उमेदवारांना मदत केल्याचे सांगितले जाते. याच कामगिरीच्या बदल्यात त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आल्याचा आरोप होत आहे. मात्र, या निर्णयामुळे भाजपची मोठी कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, एसआयटीने शाळेतील संस्थाचलकांनाही सहआरोपी बनवून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केलेले होते. शाळा व्यवस्थापनातील काही सदस्यांवर अत्याचार लपवण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यातील आरोपी तुषार आपटे आहेत.
राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारे
यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. “चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्याला भाजपनं इनाम दिलं आहे का? अत्याचार प्रकरणातील आरोपीला थेट स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवणे म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकण्यासारखे आहे. हे कृत्य अत्यंत घृणास्पद, लज्जास्पद आणि राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारे आहे. फडणवीस जेव्हा म्हणतात की त्यांचे इतर पक्षांशी वैचारिक मतभेद आहेत, तेव्हा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींशी तुमची युती होऊ शकते का?” असा सवाल राऊत यांनी केला.
काय आहे बदलापूर अत्याचार प्रकरण ?
ऑगस्ट 2024 मध्ये बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. नागरिकांनी रेल रोको आंदोलन करत संपूर्ण बदलापूर शहर बंद ठेवले होते. तपासात अत्याचाराची घटना लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. प्रकरणात अत्याचारापूर्वीच्या 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याचे उघड झाले.
याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. हे दोघे काही काळ फरार होते. अखेर ठाणे गुन्हे शाखेने त्यांना कर्जत येथील फार्महाऊसमधून अटक केली. सध्या त्यांच्यावर कल्याण सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.
कोण आहे तुषार आपटे?
बदलापूर शाळेतील दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावेळी तुषार आपटे त्या काळात शाळा व्यवस्थापनात सचिव पदावर कार्यरत होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तुषार आपटे तब्बल 44 दिवस फरार होता. अखेर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अवघ्या 48 तासांत आपटेला जामीन मंजूर झाला होता.

.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List