माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, राजकारणातील वाघीण, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन: उद्या साताऱ्यात मूळगावी होणार अंत्यसंस्कार
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी तथा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. त्यांनी मुंबईतील माहिम येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धाडसी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, शालिनीताई पाटील गत काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर माहिम येथील त्यांच्या राहत्या घरीच उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती दिवसागणिक खालावत होती. अखेर आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेऊन आपली इहलोकीची यात्रा संपवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील मूळगावी अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली आहे.
शालिनीताई पाटील यांनी मंत्री व आमदार म्हणून दणकेबाज काम केले. त्यांनी मराठा आरक्षणासाठीही आवाज उठवला. पण त्यांना त्यांचा पक्ष व जनतेची फारशी साथ मिळाली नाही. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांना मातेसमान दर्जा देत त्यांना कायम साथ दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण म्हणून केला होता.
आक्रमक आमदार म्हणून होत्या लोकप्रिय
शालिनीताई पाटील यांनी राज्याच्या राजकारणावर स्वतःची एक वेगळी छाप उमटवली होती. त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून त्या 1999 ते 2009 या काळात आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. तत्पूर्वी, 1990 मध्ये त्यांनी जनता दल व 1995 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
शालिनीताई यांनी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या नेतृत्वतील काँग्रेस सरकारमध्ये मंत्रिपदही भूषवले होते. पण त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अंतुले यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली असे सांगण्यात येते.
राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानची स्थापना
शालिनीताई समाजकार्यातही चांगल्याच अग्रेसर होत्या. 1970 च्या दशकात त्यांनी गरीब रुग्ण व महिलांच्या कल्याणासाठी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली होती. शालिनीताई या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जात असत. विशेषतः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी नेहमीच आपली भूमिका ठामपणे मांडली. महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व मिळावे यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
शालिनीताई यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. केंद्र सरकारच्या ओबीसी आरक्षणाच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली होती. त्या मधल्या काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गेल्या होत्या. पण त्यांची भूमिका तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणाविरोधात असल्याने शरद पवारांनी 2006 मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी क्रांतिसेना महाराष्ट्र नामक स्वतःचा पक्ष काढला. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कालांतराने त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर पवारांवर केली होती टीका
राष्ट्रवादी काँग्रेसमधील 2023 च्या बंडखोरीनंतर शालिनीताई पाटलांनी शरद पवारांवर टीका केली होती. वसंतदादांचे सरकार पाडणाऱ्या शरद पवारांना त्यांच्याच पुतण्याने बंडखोरी केल्यानंतर काय होते, याचा पक्का अनुभव आला असेल. त्यावेळी वसंतदादांना व त्यांच्या कुटुंबीयांना जो काही त्रास झाला, तो स्वतःला कसा होतो, हे त्यांना पुतण्याने पाठीत खंजीर खुपसल्यानंतर कळले असेल, असे त्या म्हणाल्या होत्या.
पतीच्या निधनानंतर केला होता वसंतदादांशी विवाह
शालिनीताई पाटील या वसंतदादांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांचा पहिला विवाह एका न्यायाधीशासोबत झाला होता. पण लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्या पतीचे निधन झाले होते. पुढे त्यांना मुंबई मंत्रालयात नोकरी लागली. तिथे त्यांनी मुख्यमंत्री वसंतदादा यांच्या पीए म्हणून काम केले. नंतर या दोघांनी विवाह केला.





.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List