अजितदादा गटासोबत बसल्यानंतर उलट्या होतात असा अपमान जनक उल्लेख शिंदे सेनेच्या नेत्यांनी केल्यानंतर आता भाजपचा नेताही म्हणाला अजित दादांच्या राष्ट्रवादीशी युती म्हणजे 'असंगाशी संग ' : अजित पवारांचा ही कार्यकर्त्यांना जशास तसे उत्तर देण्याच्या सूचना
लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांत सातत्याने वादाची ठिणगी पडत आहे. शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीसोबत बसल्याने आम्हाला उलट्या होतात असे विधान केले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. तसेच सत्तेतून बाहेर पडण्याचाही इशारा दिला. त्यातच आता भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादीशी युती म्हणजे असंगाशी संग असल्याचे विधान केले. त्याला प्रत्युत्तर देताना स्वतः अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. या सततच्या वादामुळे हे तिन्ही सत्ताधारी पक्ष एकमेकांपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीची मोठी हाराकिरी झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या पराभवासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीला जबाबदार धरले. त्यानंतर भाजपने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण तद्नंतरही भाजप व शिवसेनेच्या काही नेत्यांनी सातत्याने राष्ट्रवादीवर शरसंधान साधून हा वाद तेवत ठेवण्याचे काम केले.
प्रथम पाहुया तानाजी सावंत काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आल्यामुळे आम्हाला अक्षरशः उलट्या होतात असे विधान केले. आम्ही हाडामासाचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे माझे काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत केव्हाच जमले नाही. यामुळे कॅबिनेटच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसत असल्यामुळे आम्हाला उलट्या होतात. कारण आम्ही आमच्या तत्वांशी बांधील आहोत, असे ते म्हणाले होते.
अजितदादांना प्रवक्त्याचा सत्ता सोडण्याचा सल्ला
तानाजी सावंत यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजित पवारांना असे बोलणे ऐकून घेण्यापेक्षा अशा सत्तेवर लाथ मारून बाहेर पडलेले बरे असा सल्ला दिला. तसेच महायुती झाली म्हणूनच सावंत मंत्री झाले अशी मखलाशीही त्यांनी केली. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला.
आता बस्सं झाले. महायुतीतील घटकपक्षांकडून होणारी अवहेलना आता सहन होत नाही. तानाजी सावंतसारख्या माणसाला हाफकिन माणूस आहे की संस्था हे कळत नाही. त्याच्याकडून काय अपेक्षा करणार? संबंधितांनी अशा लोकांना आवर घालावा, अन्यथा आमचा संयम सुटेल, असे अमोल मिटकरी म्हणाले होते.
भाजप प्रवक्त्याने दिली वादाला नव्याने फोडणी
तानाजी सावंत व राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील वादाची धग संपत नाही तोच आता भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती म्हणजे असंगाशी संग असल्याचे विधान करून या वादाला नव्याने फोडणी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत अहमदपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील व त्यांचे कार्यकर्ते प्रचाराला बाहेर पडलेच नाहीत. त्यामुळे भाजपच्या खासदाराला पराभवाची चव चाखावी लागली. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाबरोबर झालेली युती अत्यंत दुर्दैवी आहे. खरे म्हणजे ही युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगाशी संग म्हणतात तसा संग आमच्यासोबत घडवण्यात आला, असे हाके यांनी म्हटले आहे.
अजित पवारांचे कार्यकर्त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे निर्देश
गणेश हाके यांच्या या जहरी टीकेनंतर अजित पवार यांच्या संयमाचा बांध सुटला. त्यांनी या मुद्यावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षपणे आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. मला कुणावरही टीका करायची नाही. अशा बोलण्यामुळे माझ्या अंगाला भोकंही पडत नाहीत. पण खरेच असे कुणी काही बोलले असेल तर माझेही कार्यकर्ते त्याला योग्य ते उत्तर देतील, असे ते म्हणाले. अजित पवार यांनी या विधानाद्वारे एकप्रकारे आपल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या महायुतीतील घटकपक्षांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याचेच आदेश दिलेत. त्यामुळे महायुतीतील विद्यमान वाद एका तार्किक निष्कर्षापर्यंत जाईपर्यंत थांबणार नाही हेच यामधून स्पष्ट होत आहे. राजकीय विश्लेषकांचेही हेच मत आहे.
अजित पवारांच्या निर्देशांनंतर भुजबळांची भाजप, शिवसेनेला तंबी
अजित पवार यांच्या या विधानानंतर काही वेळातच राष्ट्रवादीची मुलूख मैदानी तोफ असणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांनी मित्र पक्षांच्या नेत्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना वादग्रस्त विधाने करण्यापासून थांबवण्याची तंबी दिली. प्रवक्त्यांच्या विधानांवर कारभाऱ्यांनी लक्ष द्यावे. आपापल्या लोकांना अशी विधाने करण्यापासून थांबवावे. आता ते म्हणतील की आमच्या पक्षांचा या विधानांशी संबंध नाही. पण यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मने दुखावली जातात. निवडणुकीच्यावेळी आपण एकसंध आहोत, हे लोकांना दाखवले लागते. पण अशा विधानांमुळे आपल्यातील वादाची मजा विरोधी पक्ष घेतील. त्याचे नुकसान एकाला नव्हे तर संपूर्ण महायुतीला होणार. त्यामुळे मित्र पक्षांनी यासंबंधीच्या सूचना सर्वांना देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
तिन्ही पक्ष एकमेकांपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत का?
बदलापूर येथील एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची बाब उजेडात आली होती. त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. या प्रकरणी सरकारला चौफेर टीका सहन करावी लागली. या घटनेचे वादळ शमते न शमते तोच मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारची चांगलीच कोंडी झाली. विशेषतः यामुळे सरकारने राबवलेल्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही झाकोळली गेली. यामुळे सरकारची प्रतिमाही मोठ्या प्रमाणात मलिन होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीच्या घटकपक्षांत एकमेकांना पाण्यात पाहण्याचा हा वाद उफाळून आला आहे. त्यातून हे तिन्ही पक्ष एकमेकांपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.




.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List