दिल्लीला गेलात तर रिकाम्या हाती येऊ नका:मनोज जरागेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा; संभाजीराजे छत्रपतींनी घेतली भेट
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत मंगळवारी संपली. त्यामुळे आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे
- दरम्यान, मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यानंतर शिंदे-फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर दाखल झाले. यासंदर्भात माध्यमांनी जरांगेंना माहिती दिल्यावर ते म्हणाले की, सरकार दिल्लीला का गेले मला माहित नाहीत, पण गेलात तर मराठा आरक्षणाचा ठोस निर्णय करून या, तुम्ही रिकाम्या हाती येणार नाही, अशी खात्री वाटते. पण जर तसे झाले तर सरकारला एक क्षण देखील वेळ देणार नाही, असा इशारा त्यांनी शिंदे-फडणवीसांना दिला.
- संभाजीराजे छत्रपती यांनी आज जालन्यातील आंतरवाली सराटी येथे जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मला तुमच्या तब्येतीची चिंता वाटते, असे संभाजीराजे म्हणाले. तर, आज आंदोलनस्थळी तुम्ही आले बरे वाटले, असे मनोज जरांगे म्हणाले.
- राजे, आमच्यावर अन्याय झाला. आम्ही काय चूक केली? मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही?, असे सवाल मनोज जरांगेंनी केले. मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाच्या लेकरांवर अन्याय होत आहे. कुणबी आरक्षण विदर्भातील शेतकऱ्यांना मिळते तसेच राज्यातील सर्व मराठा समाजाला मिळावे, या आमच्या मागणीत चूक काय आहे? आम्ही कुणबीच आहोत, याचे पाच हजार पुरावे आम्ही सरकारला दिले आहे. खरे तर एक जरी पुरावा मिळाला तरी आरक्षण दिले पाहीजे, पण हे सरकार आरक्षण देत नाही.
- उपोषण सुरु करण्यापूर्वी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज आपण पुन्हा आमरण उपोषणास सुरुवात करत आहोत. या उपोषणात मी अन्न, पाणी, सलाईन काहीच घेणार नाही. कठोर असे हे उपोषण करणार आहे. जीवाची बाजू लावून ही लढाई आपण लढणार आहे.
- मनोज जरांगे म्हणाले, पूर्वी आपण 17 दिवसांचे उपोषण केले होते. सरकारने आपल्याला सांगितले होते की, तुम्ही आम्हाला वेळ द्या आम्ही तुम्हाला टिकणारे आरक्षण देऊ. सरकारने आपल्याकडे 30 दिवसच मागितले होते. आपण आज एक्केचाळीसवा दिवस आहे. या 40 दिवसांत सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे आपल्यावर उपोषणाची वेळ आली आहे.
- मनोज जरांगे म्हणाले, सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. या 40 दिवसांत सरकारने ठोस असे काहीच केले नाही. सरकारने समिती नेमली. या समितीने 15 दिवस काहीच केले नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेऊ, असे आश्वासन सरकारने दिले होते. ते गुन्हेही अद्याप मागे घेतले नाही. सारथी संस्थेबाबत विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत सरकारने अद्याप काहीच केले नाही. सरकारने दिशाभूल केली आहे.
- मराठा समाजाला आवाहन करताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने शांततेत हे आंदोलन करायचे आहे. कुठेही आंदोलन उग्र, हिंसक होणार नाही, याची काळजी घ्यावी. कुणीही आरक्षणासाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. राज्यभरात ठिकठिकाणी साखळी उपोषण करावे. नेत्यांना गावबंदी करावी. मात्र, हे करताना वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. जे नेते गावात येतील त्यांना शांतपणे आपली भूमिका समजावून सांगून परतण्यास सांगावे. पण, ही शांतता अशी असावी की आजुबाजूच्या गावांनीही या नेत्यांना प्रवेश दिला नाही पाहीजे.
- तत्पूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन केला. उपोषणाला बसू नये, असे आवाहन मंत्री गिरीश महाजनांनी जरांगेंना केले आहे. आरक्षणाचा निर्णय आपण दोन, तीन दिवसांत घेऊ, अशी ग्वाही गिरीश महाजन यांनी दिली. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही लवकरच आपल्याशी बोलतील, असेही गिरीश महाजन म्हणाले. मात्र, मनोज जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. आरक्षण घेऊ या. तेव्हाच आंदोलन मागे घेईल, असे मनोज जरांगे म्हणाले.
- सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, अशी मनोज जरांगेंची मागणी आहे. तर, आम्ही 96 कुळी मराठे आहोत. आम्हाला आरक्षण नको, अशी भूमिका घेत नारायण राणेंनी मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध केला आहे. त्यावरुन आज मनोज जरांगेंनी नारायण राणेंना सनसनीत शब्दांत सुनावले आहे. नारायण राणेंना उद्देशून मनोज जरांगे म्हणाले, कुणबी म्हणजे शेतकरी. तुम्ही शेतीच्या जीवावर मोठमोठे बंगले बांधले. त्या शेतीची तुम्हाला लाज वाटत आहे. जमीन, शेती ही आपली काळी आई आहे. मातृभूमी आहे. तिची तुम्हाला लाज वाटते. असे असेल तर आता त्या जमिनीवर नाव ठेवू नका. विकून टाका तुमची सर्व शेती आणि मग म्हणा आम्हाला कुणबी म्हणू नका म्हणून. वाचा सविस्तर
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रामाणिक आहेत. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देण्यासापासून त्यांना 100 टक्के कोणी तरी अडवत आहे. त्यामुळेच ते आरक्षणाचा निर्णय घेत नाहीये, असा आरोप आज मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत मंगळवारी (24 ऑक्टोबर) संपली. त्यामुळे आजपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषण सुरू करत आहेत. तत्पूर्वी आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वाचा सविस्तर
- मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. आज 11 वाजता जरांगे पत्रकार परिषद घेतील. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचो लक्ष लागले आहे.
- राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना सरकारला थोडा वेळ देण्याची विनंती केली आहे. मात्र, यावर मनोज जरांगे यांनी कोणालाही वेळ दिला जाणार नाही. अगदी एका तासाचाही वेळ दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. यावर जरांगे अधिक काय बोलणार? याकडेही लक्ष असणार आहे.
- जरांगेंच्या समर्थनार्थ राज्यभरात विविध गावांमध्येही सर्कलनिहाय साखळी उपोषण सुरू होणार आहेत. सरकारने जर मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर २८ ऑक्टोबरपासून हे साखळी उपोषण आमरण उपोषणात रूपांतरित होईल, असा इशारा गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे. तसेच, आंदोलनादरम्यान नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णयही आंतरवाली सराटीसह अनेक गावांत घेण्यात आला आहे.
आता समिती गुंडाळावी
२९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात शहागड येथे मराठा आरक्षण आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चानंतर जरांगे पाटील यांनी लगेचच आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांनी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमधील मंत्र्यांची रीघ लागली होती, तर सरकारला वेळ देण्याची तयारी मनोज जरांगे पाटील यांनी दाखवल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंतरवालीत दाखल झाले आणि त्यांनी जरांगे पाटलांचे उपोषण मागे घेतले, परंतु सरकारला ४० दिवसांची मुदत दिलेली असताना गेल्या ४० दिवसांत सरकारने कोणतीच ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे आता जरांगे पाटील आणि मराठा समाज संतप्त झाला आहे. सरकारने निवृत्त न्या. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे, परंतु यातून समाजाला आरक्षण मिळेलच याची शक्यता कमी असल्याने खुद्द जरांगे पाटलांनी ही समिती आता गुंडाळावी, असे म्हटले आहे.



.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List