संतप्त नागरिकांनी सुनील कावळेंच्या अंत्यविधीला आलेल्या हरिभाऊ बागडेंना माघारी पाठवले
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. याचा थेट फटका सत्ताधारी पक्षांच्या विशेषतः भाजपच्या आमदारांना बसत आहे. याचा ताजा अनुभव भाजप आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या सुनील कावळे नामक तरुणाने मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे पार्थिव शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी फुलंब्रीचे भाजप आमदार हरिभाऊ बागडे आले होते. पण संतप्त जमावाने त्यांच्याविरोधात नारेबाजी करत त्यांना आल्यापावली परत पाठवले. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
नेमके काय घडले?
सुनील कावळे यांनी मराठा आरक्षणासाठी बुधवारी मध्यरात्री मुंबईच्या एका रेल्वे पुलावर गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्यभरातील मराठा बांधवांमध्ये रोष पसरला आहे. शुक्रवारी कावळे यांचे पार्थीव अंत्यसंस्कारासाठी छत्रपती संभाजीनगरला आणण्यात आले. तिथे त्यांच्या अंत्यविधीसाठी भाजप आमदार हरिभाऊ बागडे आले होते.
यावेळी संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या काही महिला, पुरुष व तरुणांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. स्वतः हरिभाऊ बागडे यांनीही त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलकांनी त्यांचे काहीएक ऐकूण घेतले नाही. त्यांनी एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा देत बागडे यांना अक्षरशः माघारी परत जाण्यास भाग पाडले.
काय म्हणाले हरिभाऊ बागडे?
या घटनेमुळे हरिभाऊ बागडेही अवाक झाल्यासारखे दिसत होते. त्यांनी कोणताही संघर्ष टाळण्यासाठी घटनास्थळावरून काढता पाय घेणे पसंत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी संक्षिप्त संवाद साधला. त्यात त्यांनी वाद टाळण्यासाठी मी जात असल्याचे स्पष्ट केले. मी कालच सुनील कावळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. आज येथे आलो होतो. पण काही जणांनी उगीच वाद घातला. विनाकारण वाद वाढू नये म्हणून मी येथून जात आहे, असे ते म्हणाले.
सरकारला दिलेली मुदत संपण्याच्या मार्गावर
दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे. पण सरकारने या प्रकरणी अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे मराठा समाज यापुढे कोणती भूमिका घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार नाही.



About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List